(Image Source : Internet)
बीड:
बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात एका महिला वकिलावर सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. डीजेच्या प्रचंड आवाजामुळे त्रस्त होऊन तक्रार केल्याच्या कारणावरून या महिला वकिलाला शेतामध्ये अडवून लाठ्या-काठ्यांनी आणि लोखंडी पाईपने जबर मारहाण करण्यात आली. या घटनेचे धक्कादायक फोटो समाजमाध्यमांवर झपाट्याने व्हायरल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं, मुख्यमंत्री महोदय, हे हृदय पिळवटून टाकणारे फोटो पाहा आणि सांगा – अशा परिस्थितीत तुम्हाला झोप लागते तरी कशी? जर वकील असलेल्या महिलेला सार्वजनिकपणे अमानुष मारहाण होत असेल, तर सामान्य नागरिकांचं काय?
खडसे यांनी पुढे असेही नमूद केले की, “या घटनेमुळे महाराष्ट्राचा कायद्याचा धाक कुठे गेला, असा प्रश्न निर्माण होतो. आता तर महाराष्ट्राच्या गुन्हेगारी घटनांनी बिहारलाही मागे टाकलं आहे, हे दुर्दैवच म्हणावं लागेल.”
नेमकं काय घडलं?
प्राप्त माहितीनुसार, संबंधित महिला वकिलाला मायग्रेनचा त्रास असल्यामुळे तीने आपल्या घराजवळील डीजे आणि पीठाची गिरणी हटवण्याची विनंती केली होती. ही मागणी गावच्या सरपंचाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वाटली. त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी वकिलेला शेतामध्ये घेरले आणि लाठ्या, काठ्या व पाईपच्या साहाय्याने बेदम मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली असून उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले आहे.
या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ माजवली असून, मागील काही महिन्यांत जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.