(Image Source : Internet)
मुंबई:
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फाटाफुटीनंतर, राज्यातील सत्तेचं समीकरण पूर्णपणे बदललेलं पाहायला मिळतंय. अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात सध्या संघर्षाचं वातावरण आहे.
अजित पवार यांच्या गटाने विधानसभा निवडणुकीत ४१ आमदार निवडून आणत महायुतीत स्वतःचं अस्तित्व ठामपणे सिद्ध केलं आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार हे एकाच कार्यक्रमात तिन वेळा एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आता अजित पवारांनी पुन्हा एकदा एक मोठं वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केली आहे.
शुक्रवारी (ता. १८) उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, "पूर्वी शरद पवार साहेबांचं छत्र आमच्या डोक्यावर होतं, त्यांचं मार्गदर्शन मिळत होतं. पण आज त्या स्वरूपात कुणाचंच छत्र राहिलेलं नाही. त्यामुळेच आम्हाला परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून निर्णय घ्यावे लागत आहेत."
ते पुढे म्हणाले, "आम्ही अनेक वर्षं आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबत काम केलं आहे. त्यामुळे आम्हाला कधी कुठली भूमिका घ्यायची, हे चांगलंच माहिती आहे. सध्या कोणती अडचण आहे, कुठे काय करायला हवं, याचा आम्ही नीट विचार करत आहोत."
अजित पवार यांनी लाडकी बहिण योजनेबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. "ही योजना आम्ही बंद करणार नाही, असा आमचा स्पष्ट निर्णय आहे. या योजनेसाठी सुमारे ४० ते ४५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जात आहे, आणि त्याचसोबत खर्चावरही नियंत्रण ठेवतोय," असं ते म्हणाले.
वाढवणमध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या योजनेबाबत माहिती देताना ते म्हणाले, "मुंबई परिसरात आता तिसरं विमानतळ होणार आहे, जे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरेल."
ते पुढे म्हणाले, "आता एआयशिवाय पर्यायच नाही. जसं एक काळ होता की, साक्षर आणि निरक्षर असा भेद होता, त्यानंतर संगणक साक्षरता आली. आता एआयचं युग आलं आहे. या दिशेने पावलं टाकत अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे."
शेवटी, त्यांनी एक स्पष्ट इशाराही दिला, "मुख्यमंत्र्यांसोबत आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत आमचं समन्वय चांगलंच आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे पुन्हा कुणीही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. मी नेहमीच स्पष्टपणे बोलतो, तोच माझा स्वभाव आहे," असे अजित पवार म्हणाले.