देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा: ‘लाडका शेतकरी योजना’तून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजारांची अतिरिक्त मदत!

    17-Apr-2025
Total Views |
 
Ladka Shetkari Yojana
 (Image Source : Internet)
अमरावती :
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ‘लाडका शेतकरी योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत, राज्य सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ६ हजार रुपयांव्यतिरिक्त असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना आता एकूण १२ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
 
विदर्भातील शेतकऱ्यांवरील अन्याय आणि न्यायाची प्रक्रिया-
फडणवीस यांनी २००६ ते २०१३ दरम्यान विदर्भातील जमिन संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप केला. “त्या काळात शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देता त्यांची जमीन घेण्यात आली,” असे ते म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री असताना जमिनीच्या किमतीच्या ५ पट मोबदला देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. आता विदर्भातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
महत्त्वाच्या विकास योजना जाहीर-
यावेळी फडणवीस यांनी पुढील योजनांचाही उल्लेख केला:
बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांना मंजुरी
वैनगंगा-नलगंगा नदीजोड प्रकल्प
शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज
२ लाख रोजगार देणारे टेक्सटाईल पार्क
कापूस उत्पादकांसाठी क्लस्टर
६ हजार कोटींची नानाजी देशमुख योजना – दुसरी फेरी
डिजिटल शेती व नवतंत्रज्ञान
 
ड्रोन आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून जमिनीचे डिजिटायझेशन, प्रकल्पग्रस्तांसाठी महामंडळ, नवीन जीआर, कर्ज योजना यांचीही घोषणा करण्यात आली. शेतीत गुंतवणूक वाढवून तिचं उत्पादनक्षम आणि फायदेशीर बनवणं हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितले.