कॉमेडियन कुणाल कामराला हायकोर्टाकडून मोठा दिलासा; अटकेपासून संरक्षण, पोलिसांना निर्देश

    17-Apr-2025
Total Views |
 
Kunal Kamra
 (Image Source : Internet)
मुंबई :
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर उपहासात्मक गाण्याद्वारे टिप्पणी केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला (Kunal Kamra) शिवसैनिकांकडून विरोधाचा सामना करावा लागला. या प्रकारामुळे शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले होते आणि काहींनी त्याला मारहाण करण्याची भाषा केली होती. या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात कामराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 
या प्रकरणात कुणाल कामराच्या अटकेची मागणी करण्यात आली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्याला मोठा दिलासा दिला आहे. पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीच्या आधारे न्यायालयाने स्पष्ट केलं की, कामराच्या अटकेची आवश्यकता नाही. त्यामुळे, तो सध्या जिथे आहे, तिथूनच आपला जबाब नोंदवू शकतो.
 
कामराला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या असून, मुंबईत आल्यास त्याच्या सुरक्षेला धोका असल्याचं त्याच्या वकिलांनी न्यायालयात निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे न्यायालयाने मुंबई पोलिसांना त्याच्या सुरक्षेबाबतची जबाबदारी घेण्यास सांगितले. सरकारी वकिलांनी यावर उत्तर दिलं की, प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारचीच आहे.
 
या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर झाली. न्यायालयाने सांगितले की, जर आम्ही तुम्हाला तिथे (चेन्नईत) जबाब देण्याची संधी देत आहोत, तर तुम्हाला अटक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
 
मुंबई उच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केलं की, कामराच्या जबाबासाठी दोन पर्याय आहेत. एकतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवावा किंवा चेन्नईला जाऊन जबाब द्यावा. स्थानिक पोलिसांना त्यात सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात येतील. पोलिसांनीही अटक आवश्यक नसल्याचं समन्समध्ये नमूद केलं असल्याचे न्यायालयाने नोंदवले.यामुळे कुणाल कामराला तात्पुरता अटकेपासून मोठी दिलासा मिळाला आहे.