बेलोरा विमानतळाचा लोकार्पण सोहळा थाटात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पहिल्या विमानाला वॉटर कॅनन सलामी!

    16-Apr-2025
Total Views |
 
Belora Airport
 (Image Source : Internet)
अमरावती:
पश्चिम विदर्भासाठी महत्त्वपूर्ण मानला जाणारा अमरावतीमधील बेलोरा विमानतळ (Belora Airport) आज अखेर जनतेच्या सेवेत समर्पित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समवेत या विमानतळाचे उद्घाटन केले. मुंबईहून अलायन्स एअरच्या विमानाने सर्व मंत्रीमंडळासह अमरावतीत आगमन झाले. विमानतळावर पहिल्या विमानाचे वॉटर कॅननने जलदिंडीसह भव्य स्वागत करण्यात आले.
 
उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, “अमरावतीचं माझ्यावर ऋण आहे. माझ्या मातोश्रींचं या शहराशी भावनिक नातं आहे. त्यामुळे इथे काही चांगलं झालं, तर त्या सर्वाधिक आनंदी होतात, आणि त्यांचा आनंदच माझ्यासाठी सर्वात मोठा आहे.”
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, २०१९ मध्ये या विमानतळाचे काम सुरू झाले होते. केंद्रातील मोदी सरकारच्या पुढाकारामुळे हे काम केंद्र आणि राज्य सरकारने पूर्ण केलं. काही काळ काम थांबले होते, परंतु शिंदे सरकारच्या काळात हे काम वेगाने पूर्ण करण्यात आले.
 
विमानतळावर लवकरच एक भव्य पायलट प्रशिक्षण विद्यालय सुरू होणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “दक्षिण आशियातील हे सर्वात मोठं प्रशिक्षण केंद्र असेल. दरवर्षी १८० पायलट येथे प्रशिक्षित होतील आणि सुमारे ३४ प्रशिक्षण विमानं इथे उभी राहतील. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील.”
 
मुंबई-अमरावती प्रवास आता केवळ अडीच तासांत-
आजपासून अमरावती विमानतळ सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला झाला आहे. अलायन्स एअरचं ७२-सीटर विमान आज सकाळी यशस्वीरित्या उतरलं. सुरुवातीची सेवा फक्त व्हीआयपीसाठी होती, पण आता सर्वसामान्य नागरिकही याचा लाभ घेऊ शकतील. रेल्वेमार्गे मुंबई ते अमरावती प्रवासास १२ तास लागतात, परंतु हवाईसेवा सुरू झाल्यामुळे हा वेळ आता फक्त अडीच तासांवर आला आहे. हा प्रकल्प अमरावतीसाठी केवळ हवाईसेवा नव्हे, तर एक आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा टप्पा ठरणार आहे.