(Image Source : Internet)
मुंबई:
माहिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान निर्माण झालेला मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वाद आता निवळताना दिसतोय. निवडणुकीच्या वेळी मनसेकडून अमित ठाकरे रिंगणात उतरले होते, तर शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली होती. परिणामी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.
मात्र, अलीकडेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभेट घेतली. त्यानंतर दोघांमधील संबंध सुधारल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत म्हटले, “या भेटीवर मी फार बोलणार नाही, कारण मी त्यांना महत्त्व देत नाही.त्यांनी नाव न घेता शिंदेंवरही निशाणा साधला. गावी जाऊन नाराजीचं नाटक करतात, प्रॅक्टिस करून येतात,असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी मात्र या भेटीबाबत सौम्य प्रतिक्रिया दिली. “ही केवळ सदिच्छा भेट होती, बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या,” असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी कोणतीही राजकीय चर्चा न झाल्याचंही सांगितलं.
मंत्री उदय सामंत यांनीसुद्धा ही भेट वैयक्तिक असल्याचं स्पष्ट केलं, मात्र सकारात्मक संवाद झाल्याची माहिती दिली.
राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे की, ही भेट आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते. मनसे आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.