(Image Source : Internet)
हैदराबाद:
भारताच्या संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक क्रांतीचे महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची 134 वी जयंती देशभरात आणि परदेशात अभिमानाने साजरी होत आहे. दलित समाजाला अन्यायाच्या अंधकारातून बाहेर काढून, आत्मसन्मान आणि अधिकार देणाऱ्या या महामानवाची कार्यगाथा अजरामर आहे.
जन्म आणि बालपणीची जडणघडण:
14 एप्रिल 1891 रोजी महू (सध्याचे मध्यप्रदेश) येथे जन्मलेल्या बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ हे ब्रिटिश लष्करात सुभेदार होते. त्यांचे मूळ गाव कोकणातील आंबडवे असून, नोकरीनिमित्त त्यांना महू येथे रहावे लागले. लहान वयापासूनच बाबासाहेब शिस्तबद्ध जीवन जगत आले.
'आंबेडकर' आडनावाची कथा:
सातारा येथील सरकारी शाळेत शिक्षण घेताना त्यांच्या नावाची नोंद ‘भिमराव आंबावडेकर’ अशी झाली होती. परंतु, उच्चारातील अडचणीमुळे आणि शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर यांच्यामुळे त्यांचे आडनाव ‘आंबेडकर’ असे ठेवण्यात आले. पुढे बाबासाहेबांनी हेच नाव स्वीकारून ते जागतिक स्तरावर प्रसिद्ध केलं.
शिक्षणाचा कठीण प्रवास:
जातीय विषमतेमुळे शाळेत भेदभाव सहन करत असतानाही बाबासाहेबांनी शिक्षणाची गाठ सोडली नाही. सातारा, मुंबई, कोलंबिया विद्यापीठ (अमेरिका), लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा नामवंत संस्थांमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. त्यांनी BA, MA, PhD, Bar-at-Law, D.Sc. अशा विविध पदव्या मिळवल्या, तर LLD आणि D.Litt सारख्या पदव्यांनी त्यांचा गौरव झाला.
समाज परिवर्तनासाठी अखंड संघर्ष:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, संविधान निर्माण आणि समाजसुधारणा यांतून हजारो वर्षांचा अन्याय मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दलित, मागासवर्गीय आणि वंचित घटकांना नवजीवन दिलं. त्यांच्या विचारांनी आजही लाखो लोकांना प्रेरणा मिळते आहे.