(Image Source : Internet)
मुंबई:
महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, त्याचा शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी गारपिटीमुळे तयार पिकांचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आगामी पाच दिवसांसाठी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंताच वाढली आहे, कारण यामुळे पिकांना धोका निर्माण होईल.
शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठे नुकसान-
अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे असलेले उत्पादन नष्ट झाले आहे. हवामान विभागाने आगामी पाच दिवसांत काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पूर्व भारतासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. हवामान विभागानुसार, वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.
हवामान विभागाने ओडिशा, आसाम, मेघालय आणि नागालँडसाठी १५ आणि १६ एप्रिल रोजी विशेष इशारा दिला आहे. या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच मध्य प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गारपिटीसह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. बिहार आणि झारखंडमध्ये वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.