(Image Source : Internet)
मुंबई :
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील वरळी येथील वाहतूक विभागाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर एका अनोळखी व्यक्तीने ही धमकी पाठवली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
गेल्या काही काळापासून सलमान खानला वारंवार धमक्या मिळत असल्याने मुंबई पोलिसांकडून त्याच्या सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. काही महिने शांततेत गेले असतानाच, पुन्हा एकदा सलमानच्या जीवावर बेतण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तीने त्याच्या राहत्या घरात घुसून त्याला ठार मारण्याचा आणि त्याच्या गाडीला स्फोटकांनी उडवून देण्याचा इशारा दिला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया-
पोलीस उपायुक्त डी. व्ही. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ११८/२५ व ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाची दिशा ठरवली जात आहे.
सलमान खानची सुरक्षा आणखी वाढवली -
धोक्याची पातळी लक्षात घेता, सलमान खानच्या राहत्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर बुलेटप्रूफ काचांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्या घरातील खिडक्या आणि दरवाज्यांवरही अशाच प्रकारे सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या सलमान खानला महाराष्ट्र शासनाकडून वाय प्लस श्रेणीची सुरक्षा मिळत असून, ११ सशस्त्र जवान त्याच्यासोबत कायम असतात. त्याच्या ताफ्यात दोन एस्कॉर्ट गाड्याही आहेत, आणि त्याची स्वतःची गाडीही बुलेटप्रूफ करण्यात आलेली आहे.पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, धमकी पाठवणाऱ्याचा लवकरच शोध लागण्याची शक्यता आहे.