(Image Source : Internet)
बीड:
मस्साजोग (ता. गेवराई) येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येमागचा तपास अधिक खोलात जात असताना, कराड गँगच्या पूर्वनियोजित कटाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशमुख यांच्यावर हल्ला करण्यासाठी चार वेगळी, खास बनवलेली हत्यारं तयार करण्यात आली होती, असा खळबळजनक खुलासा झाला आहे.
ही भीषण घटना ९ डिसेंबर २०२४ रोजी घडली होती. देशमुख यांचे अपहरण करून त्यांना पद्धतशीरपणे मारहाण करण्यात आली. यामध्ये सुदर्शन घुलेसह अनेक आरोपी सहभागी होते. हत्येनंतर समोर आलेल्या फोटोमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली होती. परिणामी, मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला.
हल्ल्यासाठी वापरलेली चार शस्त्रं:
तपासात असे समोर आले आहे की कराड गँगने खास बनवलेल्या चार हत्यारांचा वापर केला होता:
गॅस पाईप
गाडीच्या क्लच वायरपासून बनवलेला चाबूक
बांबूची काठी
लोखंडी पाईप
या सर्व शस्त्रांचा उपयोग करून देशमुख यांच्यावर एकामागोमाग एक हल्ले करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानुसार त्यांच्या शरीरावर १५० हून अधिक गंभीर जखमा आढळून आल्या. तिघा डॉक्टरांच्या पथकाने या हत्यारांचा मृत्यू घडवणारा परिणाम स्पष्ट केला आहे.
आरोपपत्रात जोडले गेले ठोस पुरावे-
तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या आरोपपत्रात हत्येसाठी वापरलेली हत्यारं, फोटो आणि वैद्यकीय अहवाल हे महत्त्वाचे पुरावे म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे ही हत्या आधीच आखलेली आणि योजनाबद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. आता या नव्या खुलाशांमुळे तपास अधिक गडद होत असून, राजकीय वर्तुळातही पुन्हा खळबळ माजण्याची शक्यता आहे.