एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; राज्य सरकारकडून आणखी १२० कोटींचा निधी मंजूर

    12-Apr-2025
Total Views |
 
ST employees
 (Image Source : Internet)
मुंबई :
सततच्या आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या एसटी (ST) महामंडळाला राज्य सरकारने पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा तिढा सोडवण्यासाठी सरकारने एसटीला आणखी १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीचा वापर प्रामुख्याने एप्रिल महिन्याच्या पगाराचे उर्वरित वाटप आणि इतर तातडीच्या खर्चासाठी करण्यात येणार आहे.
 
एसटी महामंडळाकडून प्रवासी संख्येत वाढ झाली असली तरी इंधन, देखभाल आणि इतर प्रशासकीय खर्चामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळेच पगारासाठीही वेळोवेळी सरकारच्या मदतीची गरज भासत आहे.
 
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस केवळ ६० टक्के पगार देण्यात आला होता. उर्वरित रक्कम मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. हे लक्षात घेऊन महामंडळाने शासनाकडे तातडीने निधीची मागणी केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत सरकारने शुक्रवारी १२० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
 
दरम्यान, शनिवार आणि रविवारच्या सुट्यांमुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात शिल्लक रक्कम येण्यासाठी मंगळवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तरीही या निर्णयामुळे संतप्त वातावरणाला काहीसा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे.