(Image Source : Internet)
रायगड :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त रायगड किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी ऐतिहासिक घोषणा केली आहे. रायगड किल्ला हा केवळ पर्यटनस्थळ न राहता, युवकांसाठी प्रेरणास्थान बनावा, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अमित शाह म्हणाले, “शिवाजी महाराजांचा जन्म, राज्याभिषेक आणि शेवटचा श्वास या तिन्ही ऐतिहासिक घटना रायगडच्या भूमीवर घडल्या. ही भूमी म्हणजे केवळ इतिहास नव्हे, तर भारतीय स्वाभिमानाची साक्ष आहे. सरकारचा हेतू आहे की सातवी ते बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी रायगडला भेट दिली पाहिजे आणि शिवचरित्रातून प्रेरणा घ्यावी.”
युवकांसाठी चेतनेचं केंद्र -
शाह पुढे म्हणाले, रायगड हा युवकांसाठी ऊर्जा आणि चेतनेचे केंद्रबिंदू बनावा. शिवरायांचे जीवन हे समर्पण, बलिदान, शौर्य, स्वधर्म आणि स्वराज्याच्या विजिगीषेचे प्रतीक आहे.”
शिवमूल्यांचा जागर, देश पुढे नेणारं नेतृत्व-
कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा गौरव करत सांगितले की, “काशी विश्वनाथ कॉरिडॉर, राम मंदिर यांसारख्या ऐतिहासिक गोष्टी शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचीच पुनर्स्थापना आहेत. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षानिमित्त भारत जगात पहिले स्थान पटकावेल, असा आमचा दृढ विश्वास आहे.”
शिवरायांचा अंतिम संदेश लक्षात ठेवा-
शेवटी अमित शाह यांनी जोरदार विधान करत सांगितले, “स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेसाठी लढा कधीही थांबता कामा नये. छत्रपतींचे चरित्र हे संपूर्ण देशाने अभ्यासावे, ते प्रेरणादायी आहे आणि जागतिक पातळीवर पोहचवण्याची गरज आहे.