(Image Source : Internet)
नागपूर :
भाजप खासदार नारायण राणे यांचा नुकताच ७४ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भावनिक भाषण करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी २३ ऑगस्ट २०२१ रोजी घडलेल्या घटनेचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला.
त्या दिवशी, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात नारायण राणेंना जेवत असतानाच अटक करण्यात आली होती. याचा उल्लेख करत नितेश राणे म्हणाले, साहेबांना जेवणाच्या ताटावरून अटक करण्यात आली होती. तो क्षण मी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी तो व्हिडिओ डिलिट करणार आहे.
गेल्या दहा वर्षात खूप काही बदललं, पण कोकण आणि राणे साहेबांमधलं नातं तसंच आहे. विरोधक कितीही बोलोत, जनतेचा विश्वास अजूनही राणे साहेबांवर आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गसारख्या मतदारसंघात महायुतीला विजय मिळवून देण्यात राणे साहेबांचा मोलाचा वाटा आहे.
नितेश राणे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, "कोण कुठे जात नाही, सगळ्यांचा हिशोब इथेच होणार. ज्यांनी साहेबांना त्रास दिला, त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल. जनतेचा विश्वास आणि आमचं एकत्रित बळच पुढे जाईल.शेवटी, वडिलांविषयी आपुलकी व्यक्त करत ते म्हणाले, "साहेब माझ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक राहिले आहेत. मंत्री झाल्यानंतर पहिलं अधिवेशन होतं, तेव्हा त्यांनी मला समजावून मार्गदर्शन केलं. त्यांनी असंच आमचं नेतृत्व करत राहावं, हीच इच्छा.
नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, हा इशारा अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचे बोलले जात आहे.