(Image Source : Internet)
मुंबई :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) जवळपास ८७ हजार कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मार्च महिन्याच्या पगारापैकी केवळ ५६ टक्के रक्कम मिळाल्याने नाराज असलेल्या कर्मचाऱ्यांना उर्वरित ४४ टक्के रक्कम येत्या मंगळवारपर्यंत मिळणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत हा प्रश्न मार्गी लावला.
महामंडळाने मार्च महिन्याच्या पगारासाठी सरकारकडे १,०७५ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र शासनाकडून केवळ २७२.९६ कोटी रुपये निधी मिळाला. त्यातील एक भाग बँक कर्ज व पीएफसाठी वळवण्यात आल्याने केवळ १३५ कोटी रुपये वेतनासाठी उपलब्ध होते. परिणामी, कर्मचाऱ्यांना केवळ अपूर्ण वेतन देण्यात आलं.
कामगार संघटनांचा दबाव कामी आला
पगाराच्या अपूर्णतेमुळे कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी १० दिवसांत पूर्ण वेतन न दिल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तर एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनीही तशाच प्रकारे सरकारला सुनावले होते.
कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका
मुंबई सेंट्रल आगारातील एसटी चालक अरविंद निकम यांनी सांगितले की, “निम्मा पगार मिळाल्यावर कर्जाचे हप्ते भरल्यानंतर घरखर्च कसा चालवायचा? तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने, दीपक जगदाळे यांनी सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. घरकर्ज, शाळेची फी, आणि इतर गरजेच्या खर्चामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा आर्थिक ताण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारचा आश्वासक पवित्रा
राज्य सरकारने याची गंभीर दखल घेत उर्वरित रक्कम लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला असून, आंदोलनाची टांगती तलवारही सध्या तरी टळली आहे.