(Image Source : Internet)
मुंबई:
राज्यातील विविध भागांमध्ये हवामानात सतत बदल होत असून, पुढील ४८ तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक भागांमध्ये गारपीटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात उन्हाची काहिली, आता मेघगर्जनेसह पावसाचा इशारा -
विदर्भातील अकोला, मालेगावसारख्या भागांमध्ये तापमानाने चाळीशी पार केली आहे. ४३ ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदवले गेले असून, नागरिक उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झाले आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे आता हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, वादळी वारे व गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातही पावसाची शक्यता-
रविवारपासून कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतही पावसाचे संकेत मिळत आहेत. बाष्पयुक्त वातावरण आणि वाऱ्यांच्या दिशेतील बदलांमुळे या भागांमध्ये मेघगर्जना आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.