महाराष्ट्राला रेल्वे विकासाची मोठी भेट; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून १.७३ लाख कोटींच्या प्रकल्पांची घोषणा

    11-Apr-2025
Total Views |

Ashwini Vaishnav
 (Image Source : Internet)
मुंबई ;
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांची नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्यातील नागरिकांसाठी अनेक मोठ्या रेल्वे प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी तब्बल १ लाख ७३ हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, अशी माहिती खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
मुंबईकरांसाठी नव्या २३८ एसी लोकल गाड्या-
मुंबई उपनगरी रेल्वेसेवेच्या वाढत्या ताणाला लक्षात घेता, २३८ नवीन एसी लोकल गाड्यांची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच कल्याण-बदलापूर आणि कल्याण-आसनगाव मार्गांवरील तिसरी व चौथी मार्गिका लवकरच कार्यान्वित होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
 
गोंदिया-बल्लारशहा रेल्वेमार्गाला मंजुरी-
गोंदिया ते बल्लारशहा या २४० किमी लांबीच्या दुहेरी रेल्वेमार्गाला ४,८९० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मार्गामुळे विदर्भ आणि मराठवाडा परिसराला मोठा फायदा होणार आहे. यामुळे उत्तर-दक्षिण भारतातील रेल्वे संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
 
राज्यातील १३२ स्थानकांचा पुनर्विकास-
राज्यातील १३२ रेल्वे स्थानकांचा आधुनिकतेसाठी पुनर्विकास केला जाणार असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे. रेल्वेच्या एकूण पायाभूत सुविधांसाठी महाराष्ट्रात आतापर्यंत १.७३ लाख कोटी रुपये गुंतवले गेले आहेत.
 
पर्यटनासाठी विशेष सर्किट ट्रेन-
राज्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांना जोडणारी सर्किट ट्रेन लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.पूर्वी केवळ ११७१ कोटींचं बजेट मिळायचं, आता तब्बल २३,७७८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही बाब महाराष्ट्राच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरेल, असे फडणवीस म्हणाले.