(Image Source : Internet)
नागपूर :
निधीअभावी एस.टी. महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात केली असून, मार्च महिन्यासाठी केवळ ५६ टक्के पगार देण्यात आला आहे. उर्वरित ४४ टक्क्यांची कपात झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संपूर्ण पगाराची मागणी करत कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महामंडळाकडून मार्च महिन्याचा पगार ७ ऐवजी ९ एप्रिल रोजी देण्यात आला, तोही ४४ टक्क्यांच्या कपातीसह. महामंडळाने यामागे निधीअभावाचा हवाला दिला असला तरी कर्मचाऱ्यांनी हा निर्णय अन्यायकारक ठरवत त्याचा तीव्र विरोध केला आहे.
कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांनी पूर्ण काम केले असताना पगारात कपात करणे अमान्य आहे. यापूर्वीही अनेक भत्ते प्रलंबित असून, आता पगार कपात ही कर्मचाऱ्यांवर अन्यायाची परिसीमा आहे.
गुरुवारी कर्मचाऱ्यांनी महामंडळाविरोधात घोषणाबाजी केली. आता शुक्रवारी सर्व कर्मचारी काळी फीत लावून काम करणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.