राज्यात उष्माघाताचा पहिला बळी, तापमानाचा पारा वाढला

    26-Mar-2025
Total Views |
 
Temperature rises
 (Image Source : Internet)
संभाजीनगर:
राज्यातील तापमान (Temperature) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.अनेक ठिकाणी उष्णतेच्या झळांमुळे नागरिक हैराण झाले. यातच सोयगाव तालुक्यात तापमान ३९ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. या उष्णतेच्या लाटेचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. वाढत्या तापमानामुळे तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
 
सोयगाव तालुक्यातील निमखेडी बसस्थानकात विश्रांती घेत असलेल्या एका तरुणाचा उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे. अमोल दामोदर बावस्कर (वय २५) असे या तरुणाचे नाव आहे. तीव्र उष्णतेच्या झळा सहन न झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.
 
उष्णतेच्या लाटेमुळे पाणी कमी होणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, डोकेदुखी आणि उष्माघात यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. नागरिकांनी भर दुपारी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांच्या वतीने करण्यात येत आहे.