(Image Source : Internet)
मुंबई :
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं, यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा ठराव आज मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला. दरम्यान, हा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाच्या ठरावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला पाहिजे. याआधी मिळाला पाहिजे होता, हे खरं आहे.
पण, खरंतर कुठल्याही व्यक्तीला दोन मान्यता असतात. एक जनमान्यता...लोकमान्यता आणि दुसरी राजमान्यता. भारतरत्न पुरस्कार हा सरकारकडून देण्यात येतो. त्यामुळं ही राजमान्यता आहे. परंतु महात्मा जोतिबा फुले यांना महात्मा ही पदवी जनमान्यता आहे. ही लोकांनी दिली आहे. ती कोणीही काही केले तरी काढून घेऊ शकत नाही. ती कायम राहणार आहे. तसंच महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळवून देण्यासाठी नक्की आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, त्यासाठी प्रयत्न करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.