राज्य सरकारचा प्रवास बाबरीकडून कबरीकडे...; अंबादास दानवे यांचा हल्लाबोल

    25-Mar-2025
Total Views |
 
Ambadas Danve
 
मुंबई :
विधान परिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. राज्य सरकारचा प्रवास बाबरीकडून कबरीकडे होत आहे, या कबरीच्या नादात या सरकारची कधी कबर खणली जाईल, हे लक्षात येणार नाही. तसेच राज्यात सरकार आहे की नाही? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. विविध मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार असताना सरकार सुरळीत का चालत नाही?असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
 
२०२४ मध्ये राज्यात ७ लाख ८२ हजार ९६० गुन्हे नोंद झाले. एकट्या अमरावती विभागात २०२४ मध्ये दंगलीचे ५६४ गुन्हे घडले. नागपूरमध्ये ८८ हत्या झाल्या, छत्रपती संभाजीनगरमध्ये बलात्काराच्या १६६ घटना घडल्या, पुण्यात ५०६ गुन्हे घडले.
 
कायद्याचा धाक नसल्यामुळं या सर्व घटना घडतायेत. तसंच तुरुंगातील कैद्यांची क्षमता २७ हजार ११४ बंदी असताना ४३ हजार कैदी तुरुंगात ठेवलेत. राज्यात वर्षभरात जनतेची ५१ हजार कोटींची आर्थिक फसवणूक झाली. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेय. सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारनं पाहिजे तसा प्रयत्न करण्याची गरज असून सायबर सेल अधिक प्रभावी होण्याची गरज आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगितले. तसेच, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कविता सादर करत राज्य सरकारच्या भोंगळ कारभारावर टीकास्त्र सोडले.