(Image Source : Internet)
नागपूर :
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या नागपूर येथील वादग्रस्त पत्रकार प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणामधून त्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी लवकरच पोलिसांकडून अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. प्रशांत कोरटकरचा दुबईत असल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तो कोलकाता विमानतळावरून पळून गेला असल्याची शक्यता वर्तवली जात होती. यानंतर इंद्रजीत सावंत यांच्या वकिलांनी कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरच्या पत्नीमार्फत पासपोर्ट ताब्यात घेतला. त्यामुळे तो देशाबाहेर गेला नसल्याचे स्पष्ट झाले.
प्रशांत कोरटकरने केलेल्या अटकपूर्व अर्जावर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, याचिकेची प्रत उपलब्ध नसल्याने कोर्टाने सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. दरम्यान, पोलिसांनी त्याला तेलंगणामधून अटक केल्याची माहिती आहे.