(Image Source : Internet)
मुंबई :
कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें विरोधात केलेल्या एका गाण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या गाण्यात शिंदेंवर कामरा याने अप्रत्यक्षपणे टिप्पणी केली. या प्रकारावरून शिंदे गटाच्या शिवसेनेचे शिवसैनिक आक्रमक झाले असून, कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयावर भाष्य करत संताप व्यक्त केला. कुणाल कामरा यांनी माफी मागावी, अन्यथा त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की, महाराष्ट्राच्या जनतेनं 2024 साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे. कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातील वरिष्ठ नेते यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
तुम्ही जरूर कॉमेडी करा, व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचं काम कोणी करेल तर ते सहन केले जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. कामरांनी माफी मागितली पाहिजे. ते जे संविधानाचं पुस्तक दाखवतात, त्यांनी जर संविधान वाचले असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगिलेले आहे की, स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. म्हणून आमची मागणी आहे, त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.