(Image Source : Internet)
पुणे :
पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळीच्या बैठकीदरम्यान अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या भेटीनंतर जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल होणार, अशी चर्चा सुरु आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीकरत अजित पवार आज ८.१० वाजता बैठकीच्या ठिकाणी आले. तिथे त्यांनी उपस्थितांची निवेदने स्वीकारली. त्यानंतर तिथे जयंत पाटीलही पोहोचले. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 30 मिनिटे चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
जयंत पाटील हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहेत. मात्र यावर आता अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना स्पष्टीकरण दिले.
जयंत पाटील आणि माझ्यामध्ये एआय वर चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. प्रसारमाध्यमांनी काय आणि कोणत्या बातम्या लावाव्यात, हा त्यांचा प्रश्न आहे. पण वस्तुस्थिती पाहून बातम्या द्यायला हव्यात. आमची व्हीएसआयची बैठक होती. त्यासाठी मी आणि जयंत पाटील एकत्र आलो होतो. आजच्या व्हीएसआयच्या बैठकीत एआयचा महत्वाचा विषय होता. एआयचा फायदा होतोय. एआयचा वापर करणे काळाची गरज आहे. एआयचा वापर करुन ऊसाचे उत्पादन वाढले आहे. आम्ही त्याचा वापर फळबागा आणि इतर पिकांसाठी देखाल करणार आहोत, याबाबत आमच्यामध्ये चर्चा झाली,असे अजित पवार यांनी सांगितले.