(Image Source : Internet)
नागपूर :
नागपूरातील (Nagpur) महाल आणि हंसापुरी परिसरात १७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारात मोठे नुकसान झाले. यादरम्यान जे काही नुकसान झाले आहे, ते दंगेखोरांकडून वसूल केले जाईल. जर त्यांनी पैसे भरले नाहीत, तर त्यांची मालमत्ता विकून ही वसुली करण्यात येईल. जिथे आवश्यक असेल, तिथे बुलडोझरचा वापर केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आरोपींच्या अटकेची कारवाई सुरु -
नागपूर हिंसाचाराचा आढावा पोलीस आयुक्त, एसपी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत मी घेतला. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्यासंदर्भातील हा आढावा होता.. काही गोष्टी मी सभागृहात स्पष्ट केल्या होत्या. औरंगजेबाची कबर सकाळी जाळण्यात आली. त्यानंतर काही लोकांनी तक्रार केली. पोलिसांनी तक्रार घेतली. मात्र, कबर जाळत असताना कुराणचे आयत लिहिलेली चादर जाळली असा भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियातून अपप्रचार केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात संध्याकाळी जमाव आला, तोडफोड केली. जाळपोळ केली. लोकांवर हल्ला केला. पोलिसांनी चार पाच तासातच या संपूर्ण दंगलीला अटकाव केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेज होते, खाजगी लोकांनी जे मोबाईलवर चित्रीकरण केलं ते असेल किंवा पोलिसांनी जे चित्रीकरण केले. ज्यात दंगेखोर दिसतात त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हिंसाचारप्रकरणी 104 जणांना अटक -
आत्तापर्यंत 104 आरोपींची ओळख पटली, त्यापैकी 92 लोकांना अटक करण्यात आली आहे. तर आरोपींमध्ये 12 अल्पवयीन आरोपी आहेत. त्यांच्यावरही कायद्याने कारवाई केली. अजूनही शोध सत्र सुरू असून त्यांनाही पोलिसांकडून अटक करण्यात येईल. जो व्यक्ती दंगेखोरांना मदत करताना दिसतो त्याच्यावर कारवाई करण्याची पोलिसांची मानसिकता आहे. पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी म्हणून पोस्ट केल्या त्यांना दंगेखोरांच्यासोबत सहआरोपी करणार आहे. त्यांनी दंगा भडकवला. 68 पोस्ट आयडेंटिफाय होऊन डीलिट झाल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. अजून काही पोस्टची माहिती घेतली जात आहे. ज्यांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवली त्यांच्यावर कारवाई होईल.