मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही; अजित पवारांचे विधान

    22-Mar-2025
Total Views |
 
NCP Iftar party
(Image Source : Internet) 
नागपूर:
एकीकडे औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन नागपुरात हिंसाचार पेटला.त्यामुळे काही दिवसांपासून राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झाले.अशातच मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजानचा महिना असल्याने इफ्तार पार्ट्यांचे आयोजन देखील करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही इफ्तारचे आयोजन करण्यात येते.शुक्रवारी राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही, असे ते म्हणाले.त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चा सुरु आहे.
 
नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर सर्व स्तरावरून
शांतता राखण्याचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवारी नरिमन पॉईंट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी रमजान हा समता, त्याग, समर्पण आणि बंधुत्वाची भावना निर्माण करणारा हा पवित्र महिना आहे. रमजान केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही. रमजान आपल्याला त्याग, एकता आणि बंधुत्वाची संदेश देतो. भारत विविधतेमध्ये एकतेच प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज यांनी जातींना एकत्र घेऊन समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला. आपल्याला हाच वारसा पुढे न्यायचा असल्याचे अजित पवार म्हणाले.
 
नुकतीच होळी साजरी केली आहे. आता गुढीपाडवा आणि ईद येणार आहे. हे सर्व सण आपण एकत्र साजरे केले पाहिजेत. कारण एकता हीच आपली खरी ताकद आहे. तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या पाठीशी आहेत.
 
आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींना जो कोणी डोळा दाखवेल, दोन गटात भांडण लावून कायदा व्यवस्था बिघडवणार आणि कायदा आपल्या हातात घ्यायची गोष्ट करणार, तो जो कोणी असेल त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. माफ केलं जाणार नाही,असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.