(Image Source : Internet)
नागपूर:
राज्यातील उष्णतेचा पारा कमालीचा वाढल्याने नागरिक उखाड्याने त्रस्त झाले होते. मात्र आता हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्टसह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
अमरावती, वाशिम, नागपूर, गडचिरोली येथे पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून १९ तारखेपासून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण आजपासून ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण होत असतानाच केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं पूर्व मध्य भारत, उत्तर पूर्व भारत आणि अरुणाचल प्रगेशात 23 मार्च रोजी ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवत 20 ते 23 मार्चदरम्यान या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये उत्तर पश्चिम भारतामध्ये कमाल तापमान 3 ते 5 अंशांनी वाढणार असल्याचा इशारा आयएमडीनं जारी केला आहे.