नागपूर हिंसाचारात पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कबरीतूनही खोदून काढू; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

    20-Mar-2025
Total Views |
 
CM Devendra Fadnavis
 (Image Source : Internet)
नागपूर:
नागपूर (Nagpur) प्रकरणात ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले असतील, त्यांना कबरीतूनही खोदून काढू. सोडणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. पण पोलिसांवर हल्ला क्षम्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई नियोजित वेळेत केली जाईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले.
 
नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.
 
विधानसभेत यासंदर्भात मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर निवेदन दिलं. आता नागपूरमधील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असून पोलिसांकडून दोषींना शोधून काढण्याचं काम चालू आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी पुन्हा एकदा विधानसभेत निवेदन दिले.
 
नागपूर शांततेसाठीच प्रसिद्ध आहे. १९९२ नंतर नागपुरात कधीही दंगल झालेली नाही. परवाची झालेली घटना काही लोकांनी जाणीवपूर्वक घडवून आणली हे लक्षात येते. तिथे औरंगजेबाची कबर जाळली गेली. त्यावर कुठलीही आयात लिहिलेली नव्हती. आम्ही या गोष्टीचा सखोल तपास केला आहे. पण जाणीवपूर्वक आयाती जाळल्या अशा प्रकारचे संदेश पसरवण्यात आले आणि त्यातून हिंसाचार घडला, असे फडणवीस म्हणाले.