(Image Source : Internet)
नागपूर :
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा तडाखा कायम असून नागरिक अस्वस्थ झाले आहेत. मात्र आता काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उत्तर भाग, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच, राज्यात वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी पर्यंत राहू शकतो.
विदर्भात उष्णतेच्या लाटा तीव्र होत असून, तापमान चाळीशीपार गेले आहे. मात्र, पश्चिमी झंझावाताच्या प्रभावामुळे हवामानात बदल होत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जळगाव, धुळे, नंदूरबार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरणासोबत हलका पाऊस पडू शकतो.
तसेच, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
हे पाहता नागरिकांना उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.