शिंदे गटाचा आपला दवाखाना योजना भ्रष्टाचाराच्या संशयाखाली; ठाण्यात दवाखान्याच्या जागी साडीचे दुकान!

    09-Dec-2025
Total Views |
 
Shinde group Apla hospital scheme
 Image Source:(Internet)
ठाणे :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Shinde) महत्त्वाकांक्षी 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेवर आता भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लागले आहेत. सत्ताधारी भाजपच्या आमदार निरंजन डावखरे यांनी विधानपरिषदेत थेट या योजनेवर प्रश्न उपस्थित करत, ठाणे महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
 
विधानपरिषदेत बोलताना डावखरे म्हणाले, “उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पुढाकाराने सुरू झालेली ही योजना अतिशय चांगल्या हेतूने राबवली जात आहे, पण तळाशी अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था भ्रष्टाचार करत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. ठाणे येथील आपला दवाखाना क्लिनिक बंद असताना त्याच जागी साडी दुकान चालत असल्याचेही दिसले आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली का? तर सभागृहाला स्पष्ट करा.”
 
त्याचबरोबर त्यांनी आरोग्य योजनेच्या कार्यपद्धतीवरही सवाल केला. डावखरे म्हणाले, “ही योजना गोरगरीबांसाठी सुरू केली आहे, मात्र लोकांपर्यंत ती योग्य प्रकारे पोहोचत नाही. येथे फक्त टेस्टिंग केलं जातं आणि नंतर रुग्णांना पुढे मोठ्या रुग्णालयात पाठवले जात आहे. आपला दवाखान्यात डॉक्टर्स आणि नर्सेस नसून फक्त काही टेक्निशियन्स आहेत, त्यामुळे सेवा कितपत प्रभावी आहे हा प्रश्नच राहतो.”
 
यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्तर देताना सांगितले की, “ठाणे मनपामध्ये जर काही त्रुटी असल्यास तातडीने कारवाई केली जाईल. या योजनेत कार्यरत कर्मचाऱ्यांविषयी सुधारणा व सूचनांचे स्वागत आहे. मोहल्ला क्लिनिकसारख्या या योजनेमुळे खऱ्या गरजूना लाभ मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
 
राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या आरोग्य योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आता विषय अधिक तोंडघेऱ्यात येण्याची शक्यता आहे. ठाणे परिसरातील लोकांच्या आरोग्य सेवांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या आरोपांची शासकीय चौकशी होणार का, हे पुढील काळात दिसून येईल.