नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; सावनेरच्या महिला कबड्डीपटूचा कीटकनाशक प्राशन करून मृत्यू

    09-Dec-2025
Total Views |
 
female kabaddi player
 Image Source:(Internet)
सावनेर :
रोजगाराच्या आशेने लग्न केलेल्या एका महिला कबड्डीपटूने (Female kabaddi player) शेवटी फसवणूक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी (७ डिसेंबर) माळेगाव (टाऊन) परिसरात हा प्रकार घडला.
 
किरण सूरज दाढे (वय २९) असे मृत युवा खेळाडूचे नाव असून ती राष्ट्रीय स्तरावर चमकलेली कबड्डीपटू होती. घरची आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने आणि बराच काळ नोकरी न मिळाल्याने ती विविध सरकारी विभागांत संधी शोधत होती. मात्र प्रयत्नांना यश न मिळाल्याने ती सावनेरमधील एका दंतचिकित्सा क्लिनिकमध्ये काम करू लागली.
 
या काळात स्वप्निल जयदेव लांबघरे (वय ३०, रा. पटकाखेडी) या तरुणाने तिला नोकरीची हमी देत लग्न करण्याचं आमिष दाखवलं. किरणनेही घरातील अडचणी लक्षात घेऊन प्रस्ताव स्वीकारला. पण लग्नानंतर काही काळातच ती फसवली गेल्याचं तिला जाणवू लागलं. नोकरीची आश्वासने पूर्ण न करता स्वप्निलने उलट तिला वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्यासोबतच तिच्या भावालाही नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन त्याने पाळलं नाही.
 
त्यानंतर स्वप्निलकडून सतत फोनवरून शिवीगाळ, धमक्या, अवांछित संबंधांसाठी दबाव अशा प्रकारचा छळ सुरू झाला. संबंधांसाठी नकार दिल्यास तो घटस्फोटाची धमकी देत असल्याचंही समोर आलं. हा त्रास थांबवण्यासाठी किरणने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. तरीही त्याचा छळ थांबला नाही.
 
गुरुवारी (४ डिसेंबर) सकाळी त्रासाने त्रस्त झालेली किरण घरात कीटकनाशक प्राशन करून कोसळली. कुटुंबीयांनी तिला तत्काळ सावनेर ग्रामीण रुग्णालय, त्यानंतर नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलवलं. मात्र उपचारांदरम्यान रविवारी तिचा मृत्यू झाला.
 
किरणने मृत्यूपूर्वी स्वप्निलचे त्रासदायक मेसेज फोनमध्ये सेव्ह करून ठेवले होते. या पुराव्यांच्या आधारे सावनेर पोलिसांनी बीएनएस कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे. त्याच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत.
 
सावनेर तालुक्यातील या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रासह स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त केली जात आहे.