Image Source:(Internet)
नागपूर :
हिवाळी अधिवेशनाचा (Winter session) दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी तापला. कापूस–सोयाबीनच्या घसरत्या दरावर, वाढत्या शेती खर्चावर आणि विदर्भातील शेतकऱ्यांची बिकट होत चाललेली परिस्थिती यावर आज विरोधकांनी विधानभवनाच्या उंबरठ्यावरच आवाज उठवला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गळ्यात कापसाच्या बोंडांची माळ घालून विधानभवनात प्रवेश करताच चर्चेची दिशा बदलली. महाविकास आघाडीचे आमदार मोठ्या संख्येने एकत्र येऊन घोषणांनी परिसर दुमदुमवला. “शेतकरी त्रस्त, सरकार शांत!”, “कापसाचा भाव खालावला, सोयाबीनला बाजार नाही!” अशा घोषणांनी वातावरण ढवळून निघाले.
फलक, कापसाच्या गुंडाळ्या आणि प्रतीकात्मक साहित्य घेऊन विरोधकांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली.
वडेट्टीवार म्हणाले, “विदर्भात अधिवेशन भरतं, पण इथलंच शेतकरी जीवन संकटात आहे. कापसाचा भाव पडतोय, सोयाबीनचे दर काही उरत नाहीत. सरकारकडून फक्त घोषणा – प्रत्यक्ष मदत मात्र शून्य.”
अंबादास दानवे, आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीतील इतर नेतेही निदर्शनात उतरले. त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारला प्रश्न विचारत न्यायाची मागणी केली.
विरोधकांनी शेतमालासाठी तातडीने हमीभाव, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि खरेदी केंद्रांची कार्यक्षमता वाढवण्याच्या मागण्या केल्या. “शेतकरी वाचला तरच विदर्भ वाचेल; सरकारने दुर्लक्ष केल्यास आमची लढाई आणखी तीव्र होईल,” असा इशारा वडेट्टीवारांनी दिला.