-ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत संधी!
Image Source:(Internet)
सोलापूर :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Majhi Ladki Bahine Scheme) लाभार्थींना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रितपणे ३१ डिसेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे अनेक लाभार्थींमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात सुमारे नऊ लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यापैकी मोठ्या संख्येने महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असली तरी ३.७७ लाख महिला अजूनही प्रक्रियेपासून वंचित आहेत. शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची अंतिम संधी दिली आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील महिन्यांपासून लाभ नियमित मिळत राहणार आहे.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किरण जाधव यांनी सांगितले की, “सोलापूर जिल्ह्यातील ६० ते ६५ टक्के महिलांनी ई-केवायसी केले आहे. उर्वरित महिलांनीही ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. सरकारने दिलेली ही मुदत सर्वांसाठी मोठी सोय आहे.”
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही ई-केवायसीचे प्रमाण वाढावे म्हणून प्रशासनाकडून सतत जनजागृती सुरू आहे. दरम्यान, फेब्रुवारीपासून केवळ ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांनाच मानधन दिले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.