नवीन नियम: आता आधारची झेरॉक्स काढणे पूर्णपणे बंद; सरकारचा मोठा निर्णय

    08-Dec-2025
Total Views |
 
Aadhaar
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
सरकारने आधार (Aadhaar) कार्डाच्या वापरासाठी नवीन आणि कडक नियम जाहीर केले आहेत. यानुसार, आता हॉटेल्स, कार्यक्रम स्थळे, दुकाने किंवा इतर कुठल्याही ठिकाणी आधार कार्डच्या फोटोकॉपी घेणे किंवा गोळा करणे पूर्णपणे बंद होणार आहे. हा निर्णय आधार डेटाच्या गोपनीयतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी घेतला गेला आहे.
 
यूनिक आयडेंटिटी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन गाईडलाईन मंजूर केली असून, आता कोणत्याही संस्थेला ऑफलाइन आधार पडताळणी करण्यासाठी प्रथम UIDAI कडे नोंदणी करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर संस्थांना आधारची पडताळणी करण्यासाठी QR कोड किंवा अ‍ॅप-आधारित डिजिटल पडताळणीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
 
UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितले की, नवीन नियम लवकरच लागू करण्यात येणार आहेत. हॉटेल्स, आयोजक, दुकानधारक आणि इतर सर्व ठिकाणी आता आधाराची फोटोकॉपी घेण्याऐवजी डिजिटल पद्धतीने पडताळणी करणे बंधनकारक केले जाईल. यामुळे आधार डेटा लीक होण्याचा धोका कमी होईल तसेच कागदावर आधारित आधार पडताळणीची आवश्यकता पूर्णपणे नष्ट होईल.
 
नवीन आधार अ‍ॅपची चाचणी सुरू-
UIDAI एक नवीन अ‍ॅप विकसित करत आहे, जे अ‍ॅप-टू-अ‍ॅप आधार पडताळणीस अनुमती देईल. या प्रणालीमध्ये थेट केंद्रीय आधार सर्व्हरशी कनेक्ट होण्याची गरज नाही. हे अ‍ॅप विमानतळे, किरकोळ दुकानं, कार्यक्रम स्थळे यांसारख्या ठिकाणी वापरता येईल. याशिवाय, या अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्ते आपला पत्ता पुरावा अपडेट करू शकतील तसेच मोबाइल नसलेल्या कुटुंबातील सदस्यांना जोडण्याची सुविधा देखील मिळेल.
 
सर्व्हर डाउनटाइमची समस्या कमी होणार-
सध्या अनेकदा आधार सर्व्हर डाउन झाल्यामुळे पडताळणी अडकते. परंतु या नवीन प्रणालीमुळे QR कोड आणि अ‍ॅप-आधारित पडताळणी अधिक सुरळीत आणि प्रभावी होईल. त्यामुळे तांत्रिक अडचणींचा परिणाम कमी होईल.
 
गोपनीयता आणि डेटा सुरक्षिततेवर भर-
UIDAI च्या मते, नवीन नियमांनी आधारच्या गोपनीयतेला मोठा बळ मिळणार आहे. कागदी फोटोकॉपी काढणे बंद केल्याने डेटा चोरी, गैरवापर आणि लीक होण्याचा धोका नष्ट होईल. या नव्या अ‍ॅपला डिजिटल डेटा संरक्षण कायदा (DPDP Act) च्या निकषांनुसार तयार केले जात आहे, जो पुढील १८ महिन्यांत लागू होईल.
 
सरकारचा हा निर्णय नागरिकांच्या व्यक्तिगत माहितीच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे आणि देशात आधार प्रणालीच्या अधिक सुरक्षित व पारदर्शक वापराची दिशा यामुळे ठरणार आहे.