Image Source:(Internet)
गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (अजित पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचा पाचगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री सुमारास हा अपघात झाला असून त्यांच्या निधनाने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
विरुद्ध दिशेने आलेल्या कारने घेतला जीव-
रविवारी खासगी कारणासाठी नागपूरला भेट देऊन परतत असताना पाचगावजवळ त्यांच्या कारला समोरून आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेचा तीव्रता इतका मोठा होता की गीता हिंगे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पतींना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य राबवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
भाजप सोडल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नव्या जबाबदाऱ्या-
राजकारणातील आपला प्रवास भाजपमधून सुरू केलेल्या गीता हिंगे यांनी जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा महामंत्री अशा महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या होत्या. मात्र, स्थानिक निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपला रामराम केला. 26 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मध्ये प्रवेश करताच त्यांना महिला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला नवचैतन्य मिळण्याची अपेक्षा होती.
सामाजिक क्षेत्रातही ठसा-
गीताताई हिंगे या फक्त राजकारणापुरत्या मर्यादित नव्हत्या. त्या ‘आधार विश्व फाउंडेशन’च्या अध्यक्षा म्हणून अनेक सामाजिक उपक्रमात आघाडीवर होत्या. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी गरजूंसाठी अन्नधान्य, औषधे आणि आवश्यक साहित्याची मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. त्यांच्या या कार्याचे जिल्हाभर कौतुक झाले होते.
गीताताई हिंगे यांच्या आकस्मिक निधनाने गडचिरोली जिल्ह्यातील एक सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी व सामाजिक संघटनांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.