नागपूर हिवाळी अधिवेशन; विरोधी पक्षनेतेपदावरून संघर्ष तीव्र,आदित्य ठाकरेंचे नाव पुढे येताच जाधव नाराज!

    08-Dec-2025
Total Views |
 
Aditya Thackeray Bhaskar Jadhav
 Image Source:(Internet)
नागपूर :
हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरुवात होताच विरोधी पक्षनेतेपदाबाबत ठाकरेंच्या गटात मोठी खळबळ माजली आहे. भास्कर जाधव यांचं नाव गेल्या बराच काळापासून या पदासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी असताना, अचानक आदित्य ठाकरेंना पुढे करण्याची चर्चा सुरु झाल्याने समीकरणे बदलू लागली आहेत. उद्धव ठाकरे स्वतः आदित्यांना ही जबाबदारी मिळावी यासाठी सक्रिय असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
 
या बदलत्या परिस्थितीवर भास्कर जाधवांनी स्पष्ट शब्दांत नाराजी नोंदवली. विरोधी पक्षनेतेपदासाठी एकूण सदस्यसंख्येच्या दहा टक्के अट असल्याचा दावा सरळसरळ चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं. अशी कोणतीही तरतूद नियमावलीत किंवा घटनात्मक कागदपत्रांत नसताना सरकार मुद्दाम दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
जाधवांनी असंही म्हटलं की, ते प्रखरपणे भूमिका मांडतात, त्यामुळेच त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार पडल्यापासून अनेक संवेदनशील विषयांवर चुकीची माहिती पसरवली गेली असल्याचं ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबतही लोकांना चुकीचा समज दिला जात असल्याची टीका त्यांनी केली. उपमुख्यमंत्री पदाला घटनात्मक मान्यता नसल्याचं उद्धव ठाकरे सांगतात ते योग्य असल्याचंही त्यांनी नमूद केलं. विरोधी पक्षनेतेपदाला असलेले स्पष्ट अधिकार लक्षात घेता, या पदाभोवती राजकीय हालचाली वाढल्याचं त्यांनी सुचवलं.
 
राज्यातील महिलांविषयी सरकारची भूमिका संवेदनशील नसल्याचं सांगत त्यांनी आणखी टीका केली. काही गंभीर प्रकरणांत तपास सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री आरोपींना संरक्षण देतात, क्लिनचीट देतात, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेतेपदावरून सुरू झालेला हा वाद ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद अधिक ठळक करून गेला असून अधिवेशनाच्या सुरुवातीलाच या मुद्द्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.