Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) आजपासून सुरू झाले असून, सुरुवातीपासूनच ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यंदा पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषद—दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसताना कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे अधिवेशनाची पुढील रूपरेषा नेमकी कशी असेल, याबाबत राजकीय स्तरावर संभ्रमाचे वातावरण आहे.
विधिमंडळाच्या अधिकृत कामकाजपत्रिकेत विरोधी पक्षनेता निवडीचा उल्लेखच नसल्याने विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने परिषदेसाठी सतेज पाटील आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी विधानसभेसाठी भास्कर जाधव यांचे नाव सुचवून अधिकृत पत्रे सादर केली असतानाही ही नावे अजूनही अधिवेशनाच्या नोंदीत दिसत नसल्याने प्रश्नचिन्ह अधिकच गडद झाले आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच शेतकऱ्यांचे प्रश्न, अतिवृष्टीतील नुकसानभरपाई, राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि आरोग्य यंत्रणेतील अडचणी यांसारख्या मुद्यांवरून विरोधकांकडून सरकारला कडवे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
सरकारच्या वर्तुळातून मात्र अधिवेशन निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा दावा केला जात आहे. पण विरोधी पक्षनेत्याचा अभाव लक्षात घेता चर्चा, मांडणी आणि निर्णय प्रक्रियेत तांत्रिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आता पुढील काही दिवसांत हिवाळी अधिवेशन किती तापते आणि दोन्ही बाजूंच्या रणनीती कशा बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.