Image Source:(Internet)
मुंबई :
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता गौरव खन्नाने (Gaurav Khanna) ‘बिग बॉस 19’मध्ये जबरदस्त खेळ करत अखेर विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत त्याच्यासोबत फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल होते. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात गौरवला मिळालेल्या जोरदार मतांमुळे त्याने विजेतेपदाची ट्रॉफी पटकावली.
विजेत्याच्या नात्याने गौरवला बिग बॉस 19 ची ट्रॉफी आणि 50 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं. मात्र एवढ्यावरच त्याची कमाई थांबली नाही. शोच्या दरम्यान प्रत्येक आठवड्यासाठी गौरवला तब्बल 17.5 लाख रुपये मानधन मिळत होतं. त्यामुळे 14 आठवड्यांत त्याने सुमारे 2.45 कोटी रुपये आपल्या खात्यात जमा केले.
चाहत्यांमध्ये ‘जीके’ म्हणून ओळखला जाणारा गौरव हा आधीपासूनच ट्रॉफीसाठी पहिला दावेदार मानला जात होता. घरात भांडणं, आरडाओरड किंवा संघर्षात्मक खेळ करण्याऐवजी त्याने शांतपणे, समजूतदारपणे आणि व्यवस्थित रणनीती आखत खेळ केला. त्याच्या या संतुलित स्वभावामुळे प्रेक्षकांचा तो आवडता स्पर्धक ठरला.
सध्या गौरव खन्नाची एकूण संपत्ती 15 ते 18 कोटी रुपये इतकी असल्याचं समजतं. ‘बिग बॉस 19’चा किताब जिंकताच त्याच्या लोकप्रियतेला आणि कमाईला मोठी गती मिळाल्याचं स्पष्ट होत आहे.