एमपीएससीची परीक्षा मतमोजणीच्या दिवशीच असल्याने मोठा बदल;आयोगाचा 21 डिसेंबरचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय

    08-Dec-2025
Total Views |
 
mpse
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला ठरल्याने त्या दिवशी घेण्यात येणारी एमपीएससीची (MPSC) पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय अंतिम केला असून, परीक्षेच्या नव्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
 
आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा–2025 आता 4 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा–2025 ही 11 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. संबंधित शुध्दीपत्रक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले असून उमेदवारांना ते पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
मुळात 21 डिसेंबरला परीक्षा होणार होती. मात्र त्याच दिवशी राज्यात 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायतींसाठी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने परीक्षा केंद्रांची व्यवस्थापन क्षमता, वाहतूक कोंडी, लाऊडस्पीकरचा आवाज, विजयी उमेदवारांच्या मिरवणुका आणि कर्मचारी उपलब्धता यांसारख्या मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती.
 
या अडचणींचा विचार करून आयोगाने नियोजित दिवशी परीक्षा घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आणि परीक्षा पुढे ढकलत नवीन वेळापत्रक जाहीर केले.
 
नव्या तारखा पुढीलप्रमाणे:
गट-ब पूर्व परीक्षा: 4 जानेवारी 2026
गट-क पूर्व परीक्षा: 11 जानेवारी 2026
उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.