Image Source:(Internet)
नागपूर :
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. “संविधान टिकेल तोवरच देशात लोकशाही शाबूत राहील. बाबासाहेबांचे संविधान हेच बहुजन समाजाचे सर्वात मोठे संरक्षण,” असे ते म्हणाले.
हिवाळी अधिवेशनाबाबत बोलताना वडेट्टीवारांनी स्पष्ट केले की, “या अधिवेशनात केवळ पाच दिवस कामकाज होण्याची शक्यता आहे. प्रश्नांची उत्तरं देण्याइतपत सरकारची उर्जा आणि जबाबदारी उरलेली नाही. तरी आम्ही आमचे मुद्दे ठामपणे मांडणार आणि राज्यातील वास्तव जनतेसमोर ठेवणार.”
वन्यजीवांच्या वाढत्या हल्ल्यांकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, “विदर्भात निरंतर मानवहानी होते आहे. दररोज वाघाच्या हल्ल्यांच्या घटना नोंदवल्या जात आहेत. जंगल आशीर्वाद आहे की शाप, याचा आता गंभीर विचार व्हायला हवा. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली नागरिकांचे जीव जात असतील तर सरकारची कृती कुठे आहे?
ड्रग्ज, रोजगार आणि कायदा-सुव्यवस्थेवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “नागपूर आणि मुंबई ड्रग्जचा नवा बाजार बनत आहेत. रोजगाराच्या अभावामुळे विदर्भातील युवकांना स्थलांतर करावे लागते. सत्तेत विदर्भाचे प्रतिनिधित्व असूनही तरुणांना दिलासा नाही. कायदा-सुव्यवस्था डळमळली आहे आणि घोटाळ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे,”असा आरोप त्यांनी केला.