Image Source:(Internet)
मुंबई :
इंडिगोच्या (IndiGo) उड्डाणातील चालू अडथळ्यांमुळे देशभरातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असताना या परिस्थितीचा फटका गायक राहुल वैद्यलाही बसला आहे. गोवा ते मुंबई या छोट्या प्रवासासाठी त्याला तब्बल 4.2 लाख रुपये मोजावे लागले.
मागील तीन दिवसांपासून इंडिगोची सेवा विस्कळीत झाली असून अनेक फ्लाईट्स एकतर रद्द किंवा उशिराने धावत आहेत. कंपनीच्या ३०० हून अधिक उड्डाणांना कात्री लागल्याने हजारो प्रवासी अडचणीत आले आहेत.
राहुल वैद्यने स्वतः इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपल्या अडचणींचा उल्लेख केला. प्रवासातील हा दिवस स्वतःच्या "विमान प्रवासाच्या इतिहासातील सर्वात खराब" असल्याचे त्याने म्हटले. गुरुवारी दिल्ली, मुंबई आणि गोवा येथूनही अनेक सेवा रद्द झाल्याने तो अडकला. कोलकात्यात होणाऱ्या रात्रीच्या शोसाठी वेळेत पोहोचण्याची धांदल उडाल्याने त्याला महागडे पर्यायी बुकिंग करावे लागले.
त्याने गोवा विमानतळावरील उदास चेहऱ्याचा फोटो शेअर करत लिहिले, "आमच्याकडे शो आहे, पण आम्ही पोहोचणार की नाही याची अजूनही खात्री नाही!"
यानंतरच्या स्टोरीमध्ये त्याने मुंबईपर्यंतच्या उड्डाणासाठी घेतलेल्या अत्यंत महागड्या बोर्डिंग पासचे फोटो टाकले. देशांतर्गत उड्डाणासाठी इतका मोठा खर्च केल्याची वेळ पहिल्यांदाच आली असल्याचे तो म्हणाला. मुंबईनंतर कोलकात्यासाठी आणखी तिकिटे काढावी लागणार असल्याचीही त्याने माहिती दिली.
दरम्यान, अभिनेत्री निया शर्मा हिलादेखील या गोंधळाचा फटका बसला आहे. तिच्या देशांतर्गत फ्लाईटचे तिकिट तब्बल ५४ हजार रुपये लागल्याचे तिने सोशल मीडियातून सांगितले.
इंडिगोच्या सततच्या सेवाव्यत्ययानंतर प्रवासी आणि शेअरहोल्डरची कंपनीने माफी मागितली आहे. मागील तीन दिवसांत दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, बंगळुरू, गोवा यांसह विविध शहरांत उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. सेवा पूर्ववत करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे इंडिगोकडून सांगण्यात आले आहे.