Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
देशातील अग्रगण्य विमानसेवा असलेल्या इंडिगोची (IndiGo) अडचण सलग चौथ्या दिवशीही कायम असून, तांत्रिक बिघाड आणि क्रूची तीव्र कमतरता यामुळे देशभरातील 550 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरूसह अनेक प्रमुख विमानतळांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, अचानक बदललेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांचा खोळंबा वाढला आहे.
चेक-इन काउंटरवर सकाळपासूनच लांबलचक रांगा दिसत आहेत. अनेक प्रवाशांच्या प्रवासयोजना पूर्णपणे विस्कळीत झाल्या असून, काहींचे सामानही चुकल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोशल मीडियावरून व्यक्त होत असलेल्या नाराजीच्या लाटेला इंडिगोने प्रतिसाद देत दिलगिरी व्यक्त केली आहे. “अनपेक्षित कारणांमुळे वेळापत्रकात विस्कळीतता झाली आहे. काही परिस्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत,” असे कंपनीने स्पष्ट केले.
दरम्यान, नव्या FDTL नियमांच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने क्रू उपलब्धतेवर मोठा परिणाम होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे फ्लाइट ऑपरेशन्स आणखीनच विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
इंडिगोच्या गोंधळावर DGCA ने हस्तक्षेप करत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. नव्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावरील आज रात्रीपर्यंतची सर्व इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, तर इतर विमानतळांवर काही सेवा मर्यादित स्वरूपात सुरू असल्याचे समोर आले आहे.