वायू प्रदूषणावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीतील गंभीर वायू प्रदूषणाचा मुद्दा बुधवारी लोकसभेतही चांगलाच गाजला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रदूषणाच्या चिंताजनक परिस्थितीवर भाष्य करत संसदेचे लक्ष वेधले. दिल्लीतील हवा किती धोकादायक पातळीवर पोहोचली आहे, याचे वर्णन करताना त्यांनी केलेले विधान सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
सुळे यांनी म्हटले, “दिल्लीत फिरणे म्हणजे दिवसाला ५० सिगारेट ओढण्यासारखे आहे.”
लोकसभेत केंद्रीय उत्पादन शुल्क विधेयक, २०२५ वर चर्चा सुरू असताना त्यांनी पर्यावरणाच्या बिघडत्या स्थितीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले. राजधानीतील प्रदूषणामुळे आरोग्यावर मोठा परिणाम होत असून, त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने निर्णायक पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
सुळेंनी पुढे सांगितले की, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सर्व खासदारांशी संवाद साधून प्रदूषण नियंत्रणासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी स्पष्ट योजना आखावी. “हा विषय फक्त दिल्लीपुरता मर्यादित नाही. प्रदूषण हा राष्ट्रीय प्रश्न असून त्यावर सर्व पक्षांनी एकत्रितपणे उपाय शोधण्याची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील सतत वाढणाऱ्या AQI पातळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, डॉक्टर विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दम्याचे रुग्ण यांना प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे सांगत आहेत. अशा परिस्थितीत लोकसभेत सुळे यांनी व्यक्त केलेली चिंता प्रशासनासाठीही एक इशारा मानली जात आहे.राजधानीतील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीवरून आता केंद्र काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.