लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट; दोन महिन्यांचे ३००० रुपये एकत्र मिळणार? महिलांमध्ये वाढली उत्सुकता

    04-Dec-2025
Total Views |
 
Ladki Bahin Yojana
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) नवं अपडेट समोर आलं आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला १५०० रुपयांची मदत दिली जाते. ऑक्टोबर २०२५ पर्यंतचे हप्ते जमा झाल्यानंतर आता नोव्हेंबरच्या रकमेची प्रतिक्षा वाढली आहे. मात्र नोव्हेंबरचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने प्रशासन दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात सरळ ३००० रुपये एकाच वेळी जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाल्याने निधी वितरण तात्पुरते थांबवण्यात आले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर, म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात, दोन्ही महिन्यांचे हप्ते जमा करण्यात येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. शासनाकडून अधिकृत घोषणा नसली तरी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.
 
योजनेचा लाभ अखंडित मिळण्यासाठी सरकारने KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. KYC करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर असल्याने लाभार्थ्यांनी आपली प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा हप्ता रोखला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार असल्याच्या चर्चेमुळे राज्यातील महिलांमध्ये आशेची भावना निर्माण झाली असून, डिसेंबर अखेरीस अपेक्षित असलेल्या या ३००० रुपयांच्या रकमेवर सर्वांची नजर लागली आहे.