नागपूरमधील हॉटेलात हृदयद्रावक घटना; एका कुटुंबावर शोकाचे सावट

    30-Dec-2025
Total Views |
 
newlywed man with mother commit suicide
 Image Source:(Internet)
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधून (Nagpur) मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. बेंगळुरू येथील एका नवविवाहित तरुणाने नागपूरमधील हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून, या घटनेनंतर त्याच्या आईनेही विष प्राशन करून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे. सूरज शिवण्णा असे मृत तरुणाचे नाव असून, त्यांची आई जयंती शिवण्णा यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात अतिदक्षता उपचार सुरू आहेत.
 
सूरज काही दिवसांपूर्वी आईसोबत बेंगळुरूहून नागपूरला आला होता. वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये दोघांचा मुक्काम होता. शनिवारी सकाळी सूरजने हॉटेलच्या खोलीत छताच्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. मुलाचा मृतदेह पाहून आईनेही विष प्राशन केले. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला, मात्र तोपर्यंत सूरजचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद आणि मानसिक तणाव या घटनेमागे कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 
सूरजचा विवाह गणवी हिच्याशी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडला होता. विवाहानंतर दोघे हनिमूनसाठी श्रीलंकेला गेले होते. मात्र तिथेच वाद उद्भवल्याने हनिमून अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. परतल्यानंतर गणवीच्या माहेरच्या लोकांनी सासरकडील मंडळींवर गंभीर आरोप केले होते. सासरी मानसिक छळ आणि अपमान होत असल्याचा दावा करण्यात आला होता.
 
या मानसिक तणावातून गणवीने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले होते. व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असतानाच गुरुवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गणवीच्या कुटुंबीयांनी सूरज आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा बेंगळुरूमध्ये दाखल केला होता. या प्रकरणामुळे सूरजवर मोठा सामाजिक दबाव निर्माण झाला होता.
 
या साऱ्या घडामोडींमुळे भयभीत झालेला सूरज आईसोबत नागपूरला आला होता. मात्र इथेच त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे तपासातून समोर येत आहे. या घटनेची माहिती सूरजचा भाऊ संजय शिवण्णा याने नागपूर पोलिसांना दिली. नागपूर पोलीस बेंगळुरू पोलिसांच्या संपर्कात असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. नव्या संसाराची अशी दुर्दैवी समाप्ती झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.