नागपूर :
नागपूर महानगरपालिका निवडणूक (Nagpur Municipal Corporation) २०२६च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने उमेदवारीबाबत आपली रणनीती उघड केली आहे. अधिकृत उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपकडून एबी फॉर्मचे वितरण सुरू झाले असून, यावेळी पक्षाने मोठा प्रयोग करत अनेक प्रस्थापित व ज्येष्ठ नेत्यांना डावलले आहे. त्याचवेळी तरुण, नव्या चेहऱ्यांना आणि पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे भाजपच्या राजकारणात खळबळ उडाली असून, संजय बंगाले, अविनाश ठाकरे, प्रवीण भिसीकार, ज्योती डेकाटे, दीपराज पार्डीकर, अर्चना हेडनकर यांसारख्या कद्दावर नेत्यांची तिकिटे कापण्यात आली आहेत. दुसरीकडे शिवानी दाणी, योगेश पाचपोर, श्रेयस कुंभारे, दुर्गेश्वरी कोसेकर यांसारख्या तरुण कार्यकर्त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. तसेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या दर्शिनी धावड, नेहा निकोसे आणि मनोज संगोडे यांनाही उमेदवारी देत पक्षाने सामाजिक-राजकीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रभागनिहाय उमेदवार जाहीर होताच अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. विशेषतः प्रभाग क्रमांक १७, ३६ आणि ३८ मध्ये उमेदवारी न मिळाल्याने उघड विरोध सुरू झाला आहे. प्रभाग १७ मध्ये माजी नगरसेवक विजय चुटुले यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले असून, “जुने आणि संघर्ष करणारे कार्यकर्ते डावलले गेले तर पक्षासाठी काम करणार नाही,” असा थेट इशाराही देण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमदार संदीप जोशी यांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली.
दरम्यान, प्रभाग ३८ मध्येही ‘बाहेरील उमेदवारांना प्राधान्य’ दिल्याच्या आरोपांमुळे असंतोष कायम आहे. काही नाराज नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, भाजपसमोरील अंतर्गत आव्हाने अधिक तीव्र होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
तरुणांवर भर देत नवे नेतृत्व पुढे आणण्याचा भाजपचा हा प्रयत्न पक्षाला कितपत यश देतो, की अंतर्गत नाराजी निवडणुकीत अडचणी निर्माण करतेयाकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.