शिर्डी :
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी शिर्डी येथील साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि साईचरणी पाच कोटी रुपयांची देणगी अर्पण केली. साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनंत अंबानी साईबाबांच्या दरबारात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चा केली, निळी चादर अर्पण केली तसेच सायंकाळच्या आरतीत सहभाग नोंदवला. संस्थानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भेटीदरम्यान अनंत अंबानी यांच्याशी विविध समाजोपयोगी आणि धर्मादाय उपक्रमांवर चर्चा झाली.
अनंत अंबानी यांची ही आध्यात्मिक यात्रा केवळ शिर्डीपुरती मर्यादित नसून, याआधी त्यांनी गुजरातमधील श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरातही दर्शन घेतले होते. भगवान शिवाला समर्पित असलेले हे मंदिर हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र स्थळांपैकी एक असून, त्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा मोठा आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात अनंत अंबानी यांनी जागतिक फुटबॉल क्षेत्रातील दिग्गज लिओनेल मेस्सी, लुइस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल यांना गुजरातमधील ‘वंतारा’ वन्यजीव बचाव व संरक्षण केंद्राला भेट देण्यासाठी आमंत्रित केले होते. या भेटीदरम्यान भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. मेस्सी यांनी पारंपरिक धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला, तसेच वन्यजीवांच्या संवर्धन कार्याची माहिती घेतली.
या भेटीत मेस्सी यांची साधेपणा, संवेदनशीलता आणि मानवी मूल्यांची जाणीव प्रकर्षाने दिसून आली. सामाजिक बांधिलकी, आध्यात्मिक श्रद्धा आणि पर्यावरण संरक्षण या तिन्ही बाबींमध्ये अनंत अंबानी यांचा सक्रिय सहभाग पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.