पुणे :
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘अजित पवारांनी (Ajit Pawar) उमेदवारी अर्ज दाखल केला’ अशी बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र या चर्चेमागील वास्तव वेगळेच असल्याचे पुढे आले आहे.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार नव्हे, तर पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजित पोपट पवार यांनी महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी प्रभाग क्रमांक २५ ड मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ या चिन्हावर अर्ज भरला असून, अद्याप पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म मिळालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवारांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत अर्जावर ‘अजित पवार’ हे नाव दिसताच सुरुवातीला मतदारांमध्ये आणि राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला.
नावामुळेच चर्चेला उधाण-
राज्यात अजित पवार हे नाव सर्वपरिचित आहे. त्यामुळे त्याच नावाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची माहिती येताच अनेकांनी हा निर्णय थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचा असल्याचा अंदाज बांधला. मात्र नावातील साधर्म्यामुळे हा केवळ गैरसमज असल्याचे स्पष्ट झाले असून, याच कारणामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादीची एकत्रित रणनीती?
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीचे पिंपरी अध्यक्ष योगेश बहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १२८ जागांपैकी पिंपरीतील १८ जागा शरद पवार गटाला (तुतारी चिन्ह) देण्यात आल्या आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ९ आणि २० मध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. शरद पवार गटातील चार इच्छुक उमेदवार अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले.
बंडखोरी रोखण्यासाठी सावध पावले-
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आपली अधिकृत उमेदवारांची यादी शेवटच्या क्षणी जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी आज दुपारी १२ वाजता क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. याच कारणामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस—दोन्ही पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात सावध भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे.
एकंदर पाहता, नावातील साधर्म्यामुळे निर्माण झालेला गोंधळ, राष्ट्रवादीतील अंतर्गत समीकरणे आणि बंडखोरीची भीती यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होताना दिसत आहे.