Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुका शिगेला पोहोचत असताना राजकारणात एका अनपेक्षित भेटीने नवीन चर्चांना उधाण आले आहे. मंगळवारी उशिरा मुंबईतील एका खासगी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांची अचानक गाठ पडली. दोघांमध्ये जवळपास वीस मिनिटांचा संवाद झाल्याने या भेटीचे राजकीय अर्थ काढण्यास सुरुवात झाली आहे.
कार्यक्रमातील समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये संजय राऊत मास्क घालून शांतपणे बसलेले दिसतात, तर फडणवीस त्यांच्या शेजारी संवाद साधताना दिसत आहेत. सूत्रांनुसार, मुख्यमंत्र्यांनी राऊत यांच्या प्रकृतीची सविस्तर चौकशी केली. नुकत्याच झालेल्या उपचारांनंतर राऊत पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याने ही भेट अधिक मैत्रीपूर्ण ठरली.
राज्यभर निवडणूक वातावरण तापले असताना विरोधी राजकीय भूमिकेत असलेल्या दोन नेत्यांची अशी भेट होताच विविध अटकळींना उधाण आले आहे. ही केवळ शिष्टाचाराची भेट की मागे काही राजकीय रणनीतीची हालचाल सुरू आहे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. आगामी निवडणूक समीकरणांच्या दृष्टीने कोणते संकेत या भेटीतून दिले गेले का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी फडणवीसांविषयी सकारात्मक भूमिका व्यक्त केली होती. “फडणवीस आमचे जुने सहकारी. आजारपणात त्यांनी फोन करून विचारपूस केली. राजकारण वेगळं, पण मानवी नातं वेगळं,” असे राऊत म्हणाले होते. त्यावर फडणवीसांनीही “मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर आमच्यात कुठलाही दूरावा नाही,” असे सांगत सौहार्दाचा सूर जपला होता.
यामुळे कट्टर राजकीय स्पर्धा असली तरी नेत्यांमधील वैयक्तिक नातेसंबंध अजूनही दृढ असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे. आता या अनपेक्षित संवादाचा प्रभाव राज्यातील आगामी राजकीय समीकरणांवर पडतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.