लाडक्या बहिणींच्या मदतीवर प्रश्नचिन्ह; केवायसीबाबत तटकरेंचा स्पष्ट इशारा

    29-Dec-2025
Total Views |
 
Tatkare
 Image Source:(Internet)
मुंबई :
डिसेंबर संपण्याच्या उंबरठ्यावर असतानाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahien Yojana) नोव्हेंबरचा आर्थिक लाभ अद्याप अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे एकत्रित ३००० कधी मिळणार, याबाबत लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचवेळी ई-केवायसीसाठीची अंतिम मुदत जवळ आल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.
 
ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांना योजनेचा पुढील लाभ मिळणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.केवायसीवर तटकरेंची ठोस भूमिका आदिती तटकरेंनी सोशल मीडियावरून लाडकी बहीण योजनेविषयी माहिती देताना सांगितले की, योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. केवायसीसाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली असून आता फारसे दिवस शिल्लक नाहीत. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
 
लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रिया ऑनलाइन असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर महिलांनी ती पूर्ण केली आहे. मात्र अजूनही लाखो महिलांची केवायसी बाकी आहे. शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
दरम्यान, ई-केवायसी केलेल्या महिलांनाच पुढील टप्प्यातील आर्थिक मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने नोव्हेंबर–डिसेंबरचा एकत्रित हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य ठरणार आहे.