कुलदीपसिंह सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा जोरदार झटका; हायकोर्टाच्या जामिनाला स्थगिती

    29-Dec-2025
Total Views |
 
Kuldeep Singh Sengar
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपी आणि भाजपचा माजी आमदार कुलदीपसिंह सेंगर (Kuldeep Singh Sengar) याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. सेंगर यांची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करून दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला जामीन आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला आहे.
 
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होताच न्यायालयाने सेंगर याच्या जामिनाला तात्काळ स्थगिती दिली. तसेच या प्रकरणी कुलदीपसिंह सेंगर यांना नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
 
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, हायकोर्टाचा आदेश सध्या अमलात आणता येणार नाही, असे स्पष्ट केले.
 
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सेंगर यांच्या सुटकेच्या आशांना मोठा धक्का बसला असून, उन्नाव प्रकरण पुन्हा एकदा देशभर चर्चेचा विषय ठरले आहे. पुढील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणावर अंतिम भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.